आयव्हीएफ उपचार पद्धती सुरु असताना अनेक अनिश्चितता जाणवतात. प्रत्येक केस स्वतंत्र आणि जोडप्या-जोडप्यांसाठी वेगवेगळी व विशिष्ट असते. ट्रीटमेंटच्या प्रत्येक पायरीचे निष्कर्ष काय निघू शकतील याचे भविष्य वर्तविता येत नाही. प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी साधायच्या, कशा अनुभवातून जायचे ते नीट समजावे म्हणून मी सोप्या भाषेत सर्व महत्त्वाचे टप्पे पुढे वर्णन करून सांगितले आहेत. ते वाचून आयव्हीएफ म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेता येईल.
काही जोडप्यांना अनेक महिने, कधी कधी अनेक वर्षे प्रयत्न करून निराशा पदरी येते. बहुतेकवेळी गर्भधारणेचे इतर सर्व मार्ग विफल झाल्यानंतर आयव्हीएफ चा विचार होतो. परंतु काही जोडप्यांच्या बाबतीत आयव्हीएफ शिवाय पर्यायच नसतो.
पुढील लक्षणे दिसून येत असली तर आयव्हीएफ ची आवश्यकता आहे हे लगेच लक्षात यायला हवे.
- अवरोधित बीजांड वाहक नलिका (फॅलोपियन ट्यूब्स)
- स्त्रीचे वाढलेले वय
- एन्डोमेट्रिओसिस
- तीव्र स्वरूपाच्या पौरूषेय अडचणी
- सरोगसी ची गरज
- डोनर एग ची गरज
- अयशस्वी IUI पद्धती
आयव्हीएफ चे तंत्रज्ञान गेल्या चाळीसेक वर्षांपासून विकसित होत आले आहे. त्याबद्दल तुम्ही आधी काही वाचले असण्याची शक्यता आहेच. स्त्रीच्या शरीराच्या बाहेर, प्रयोगशाळेमध्ये तिच्या बीजांडाचा आणि तिच्या जोडीदाराच्या शुक्राणूंचा संयोग घडवून गर्भनिर्मिती केली जाते त्या प्रक्रियेला आयव्हीएफ तंत्रप्रणाली म्हणतात. पण हे प्रत्यक्ष करण्याआधी आणि नंतरही यापद्धतीत अनेक टप्पे ओलांडावे लागतात. ते टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
आयव्हीएफ चे पाच टप्पे
1. स्त्रीबीज उत्सारणाला उत्तेजित करणे (कंट्रोल्ड ओवेरियन हैपरस्टिम्युलेशन)-
स्त्रीची मासिक पाळी नियमित असली तर दर महिन्याला फक्त एक बिजांड तयार होते. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये जास्ती स्त्रीबीजे तयार व्हावीत म्हणून काही औषधे (इंजेकशन्स) दिली जातात. हि औषधे अंडाशयांना उत्तेजित करून फक्त एकाऐवजी अधिक बीजांड निर्माण करतात.
या टप्प्यामध्ये बीजांड निर्मिती आणि विकास यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्त्रीला नियमितपणे अल्ट्रासाऊंड परीक्षण करून घ्यावे लागते.
2. विकसित बीजांड शरीराबाहेर काढणे (ऊसाइट पिक उप)-
फॉलिकल्सचा साईझ पुरेसा झ्याल्या नंतर स्त्रीला एक ट्रिगर इंजेकशन दिले जाते. या इंजेक्शनमुळे बीजांड परिपक्व व्हायला मदत होते. ३४ ते ३६ तासांनंतर ऊसाइट पिक उप नावाची छोटी शस्त्रक्रिया करून बीजांड अतिशय काळजीपूर्वक अलगद बाहेर काढले जातात. ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते. शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटीमध्ये सौम्य पेटके (क्रॅम्प्स) येतील पण एका दिवसाच्या आत क्रॅम्प्स बंद होतात. ओटोपोटीमध्ये फुगीरपणा आणि दबाव वाटू शकतो. ही अवस्था काही दिवसच टिकून राहते.
3. नवऱ्याचे वीर्य सॅम्पल-
ऊसाइट पिक उप च्या दिवशी नवऱ्याला प्रयोगशाळेत वीर्य सॅम्पल देण्यास सांगितले जाते. प्रयोगशाळेत त्या वीर्यामधून सशक्त शुक्राणू टेस्ट ट्यूब मध्ये यंत्राद्वारे वेगळे केले जातात.
4. प्रयोगशाळेत बीजांडांचा आणि नवऱ्याच्या शुक्राणूंचा संकर घडवणे-
बीजांड ठेवलेल्या बशीमध्ये (पेट्री-डिश) शुक्राणू सोडले जातात आणि नैसर्गिकरित्या, आपसूक त्यांच्यामध्ये संकर होण्याची वाट पहिली जाते (आयव्हीएफ). काही केसमध्ये, शुक्राणू एका अतिसूक्ष्म काचेच्या सुईद्वारे बीजांडाच्या आत सोडला जातो. ह्याला इंट्रासायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) म्हणतात. बीजांड आणि शुक्राणू यांचा संकर झाला असता गर्भ तयार झाला असे म्हणतात. असे फलित बीजांड (भ्रूण ) ३ ते ६ दिवस आयव्हीएफ प्रयोगशाळेत जोपासले जातात.
5. गर्भाचे स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपण (एम्ब्र्यो ट्रांसफर)-
ऊसाइट पिक उप च्या दिवसापासून स्त्रीला वेगळी औषधे सुरु केली जातात. गर्भाशयाचे आतील त्वचावरण प्रत्यारोपणासाठी सिद्ध करणे हे त्या औषधमागचे प्रयोजन असते. ही औषध योजना गर्भाशयात गर्भ रुजावा यासाठी अतिशय महत्वाची आहे.
बीजांड आणि शुक्राणू यांचा संयोग घडून आल्यावर तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी डॉक्टर एक किंवा दोन गर्भ गर्भाशयात प्रत्यारोपित करतात. ही प्रत्यारोपणाची क्रिया भूल न देता, स्त्रीला जागे ठेऊन केली जाते.
आता २ आठवडे उलटून गेले की मग प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात येते. आयव्हीएफ प्रक्रियेमधले हे शेवटचे २ आठवडे म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सर्वात लांबलचक काळ वाटल्याचे अनेक जणींनी मला सांगितले आहे. या दोन आठवड्यात बेडरेस्टची गरज नसते. उलट, मी त्या काळात सर्व जणींना आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये सक्रिय आणि बिझी राहायला सांगते. अर्थात नेमून दिलेली औषधे चालू ठेवायची असतात. शारीरिक कष्टाची कामे आणि समागम टाळायचा असतो. थोड्या दिवसांनंतर फिरायला जाणे, हलकाफुलका व्यायाम किंवा साधी योगासने केली तर हरकत नाही.
या दरम्यान तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल जरा जास्तीच भान जागृत झाल्याचे जाणवेल. ओटीपोटीमध्ये थोडे पेटके येणे, पोटात फुगीरपणा वाटणे, रक्ताचे डाग दिसणे, थकवा जाणवणे किंवा स्तन हुळहुळणे असा त्रास होऊ शकतो. यातले काहीही जरी झाले तरी ते स्वाभाविक असते आणि त्याबद्दल काळजी करण्याचे कारण नसते. यापैकी कोणतीही लक्षणे तुम्ही प्रेग्नन्ट आहात की नाही याची दर्शक नसतात. प्रेगग्नसी टेस्ट नंतरच ते कळते.
तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न पडले असतील किंवा काळजी वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. त्यांना तुमची केस हिस्टरी ठाऊक असते. तुमच्या शंकांचे योग्य निरसन डॉक्टर करू शकतात.
बेस्ट ऑफ लक!!