दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान व सध्याच्या परिस्थितीत वंध्यत्वाशी झगडणाऱ्या अनेक जोडप्यांचे प्रजनन क्षमतेकरिता सुरु असलेले उपचार पुढे ढकलण्यात आले आहेत. जगातील बर्याच भागांमध्ये कोरोना पॅन्डेमिकमुळे प्रजनन क्षमतेकरिता सुरु असलेले उपचार , इलेक्टीव्ह सर्जरी, इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आय यू आय) आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आय व्ही एफ) सारख्या प्रजननासंबंधीचे उपचार (ट्रिटमेंट) रोखण्यात आले आहेत.
कोरोनासारख्या साथीच्या काळातही कर्करोगासारखा गंभीर आजार व त्याचे निदान हे कोणासाठी थांबणे शक्य नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरने तरुण पिढीला ग्रासले आहे. स्त्रियांमधे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातील स्त्रियांमध्येही काही कर्करोगाचे निदान होणे तसेच प्रजननसंस्थेशी निगडीत अशा कर्करोगांचे निदान तरूण वयात होणे ही बाब गंभीर आहे. कर्करोग आणि त्यामुळे किंवा त्यावरील उपचारांमुळे येणारे वंध्यत्व हा धोका तरूण पिढीला हादरवणारा आहे.
आपण किंवा आपल्यास ओळखत असलेल्या काही तरुण व्यक्तीस कर्करोगाचे निदान झाल्यास, कर्करोगाच्या उपचारामुळे प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होऊ शकतो व कशाप्रकारे प्रजनन क्षमता राखता येईल हे जाणून घ्या. हल्ली उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तसेच कर्करोगावरील आधुनिक व कमी हानिकारक उपचार पध्दतींमुळे वाचलेल्या तरूण व्यक्तीला प्रजनन क्षमता राखून विविध पर्यायांनी पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करणे कसे शक्य आहे ते समजण्यासाठी पुढे लिहिलेले वाचा.
कर्करोगाचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?
कर्करोगाच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम तात्पुरते किंवा कायमचे असू शकतात. कर्करोगाच्या उपचाराने प्रजननास हानी पोहोचण्याचा धोका हे रुग्णांचे वय, कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा तसेच कर्करोगाच्या उपचार पध्दतीवर अवलंबून असतो.
शस्त्रक्रिया – शस्त्रकियेच्या माध्यमातून अंडकोष (ऑर्किडेक्टॉमी), गर्भाशय (हिस्टरेक्टॉमी) किंवा अंडाशय (ऊफेरोक्टोमी) काढून टाकल्यास भविष्यातील प्रजनन क्षमतेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच ओटीपोटात किंवा ओटीपोटाजवळीत भागांमध्ये कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे गर्भधारणेस व्यत्यय येऊ शकतो. किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असते.
केमोथेरपी – प्रजननक्षमतेवर होणारा केमोथेरपीचा प्रभाव हा औषध आणि त्याच्या डोसवर अवलंबून असतो. अल्किलेटिंग एजंट्स आणि ड्रग सिस्प्लाटिन हे जास्तीत जास्त नुकसान करतात. ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात डोस, केमो आणि रेडिएशन थेरपी आवश्यक असतात त्यांना प्रजननक्षमतेचे कायमस्वरुपीचे नुकसान होण्याचा धोका असतो.
रेडिएशन- रेडिएशनमुळे होणारे नुकसान रेडिएशन फील्डचे स्थान, आकार आणि दिलेल्या डोसवर अवलंबून असते. जास्त प्रमाणात रेडिएशन अंडाशयातील अनेक किंवा सर्वच अंडी नष्ट करू शकते ज्यामुळे वंध्यत्वाची समस्या तसेच रजोनिवृत्ती लवकर होते. गर्भाशयाच्या किरणोत्सर्गाच्या नुकसानीमुळे गर्भपात होणे, मुदतीपूर्वी जन्माची आणि कमी वजनाच्या बाळांची जोखीम वाढू शकते. कर्करोगाची इतर औषधे- स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगासह काही विशिष्ट कर्करोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी संप्रेरके प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. फर्टीलिटी प्रिझर्वेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा जोडप्याची त्यांनी निवडलेल्या वेळी कुटुंब सुरू करण्याची क्षमता जपणे होय. आणि याकरिता ऑन्कोफर्टीलिटी – एग फ्रीझिंग, एम्ब्रियो फ्रीझिंग, सिमेन फ्रीझिंग यांचा वापर करता येतो. कर्करोगावरील उपचारानंतर होणाऱ्या गर्भधारणेमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढत नाही किंवा प्रसुती आणि येणा-या बाळाला धोका निर्माण होत नाही.