जागतिक हिपॅटायटिस दिवस २८ जुलै: पुरुष-स्थित वंध्यत्व आणि हेपटायटिस बी चा संसर्ग

By Dr Sneha Sathe, Fertility Consultant, Nova IVF Fertility Mumbai

(लोकांमध्ये हेपटायटिस बी बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रोगाचे २०३० पर्यंत संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी दर वर्षी २८ जुलै हा दिवस हेपटायटिस बी दिन घोषित करण्यात आला आहे.) पुढे वाचा

हेपटायटिस बी चा आजार ही एक जागतिक समस्या आहे. हेपटायटिस बी नावाच्या विषाणूचा (व्हायरस) यकृताला (लिव्हर) संसर्ग झाल्यामुळे हा जीवघेणा आजार होतो. या संसर्गाचे दोन प्रकार आहेत. अल्पकालीन म्हणजे ऍक्यूट इन्फेकशन आणि दीर्घकालीन म्हणजे क्रॉनिक इन्फेकशन. अल्पकालीन संसर्ग सहा महिन्यांपर्यंत टिकतो. त्या पुढे तो टिकला तर त्याला दीर्घकालीन संसर्ग समजतात. आपली रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी पडली असता असं होतं. त्या अवस्थेत गेल्यावर हा आजार माणसाला मरेपर्यंत धरून ठेवतो. याच्या परिणामी लिव्हर सिरॉसिस किंवा लिव्हर कॅन्सर होण्याची रिस्क असते. लहानपाणीच या विषाणूचा संसर्ग झाला तर तो क्रॉनिक ठरण्याचा धोका जास्त असतो. 

जगभरात हेपटायटिस बी संसर्गाची २५ कोटी लोकांना बाधा झाली आहे असा एक अंदाज आहे. सामान्य लोकांना या आजारासंबंधी फारशी माहिती नसते. २०१६-१७ साली WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने केलेल्या पाहणीनुसार एकूण २५ कोटी संसर्गित लोकांपैकी फक्त २.७ कोटी (१० ५ टक्के) लोकांना आपल्याला हा आजार असल्याचे माहित होते. त्यांपैकी फक्त ४५ लाख लोकांवर निदान पक्के होऊन इलाज चालू होते. 

हेपटायटिस बी चा संसर्ग रक्त, वीर्य किंवा इतर शरीरजन्य द्रवांच्या माध्यमातून होतो. बाईला जर विषाणूची बाधा असेल तर गर्भावस्थेत संसर्ग बाळापर्यंत पोहोचू शकतो. प्रसूती दरम्यान तो पोहोचण्याची शक्यता जास्त असते. कधी कधी स्तनपानाबरोबर देखील बाळापर्यंत संसर्ग पोहोचण्याची शक्यता असते. 

पुरुषाला जर क्रॉनिक इन्फेकशन झाला असेल तर त्याच्यामध्ये वंध्यत्वाचा दोष आढळून येतो. हेपटायटिस बी व्हायरसचा DNA शुक्राणूंमध्ये समाविष्ट झाला असेल तर वीर्याचे प्रमाण घटणे, त्यातील शुक्रजंतूंची संख्या खालावणे, शुक्राणूंच्या रचनेमध्ये फेरफार होणे आणि मोटिलिटी कमी होणे अशा अवस्था निर्माण होतात. एखाद्या जोडप्यात फक्त पुरुषाला हेपटायटिस बी असेल तर स्त्रीला लस टोचली तर तो संसर्ग तिच्यापर्यंत आणि बाळापर्यंत पोहोचणे थांबवता येते. इन्फर्टिलिटीची कोणतीही ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी हेपटायटिस बी, हेपटायटिस सी, HIV अशा संसर्गाची पडताळणी करणं अतिशय महत्वाचं आहे. दोघांपैकी कुणा एकाला जरी त्या विषाणूची बाधा झाली असेल तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या सल्ल्याने पुढचे उपाय निश्चित करण्याआधी फर्टिलिटी एक्स्पर्टचा सल्ला घेणे आवश्यक असते.