तुम्ही कदाचित इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट चा विचार सुरु केला असेलच. त्याबद्दल वाचन आणि सल्लामसलतही सुरु केली असेल. तर मग तुम्ही HSG टेस्ट विषयी नक्की ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. एचएसजी हिस्टेरोसालपिंगोग्राम (hysterosalpingogram) या ग्रीक शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणून वापरतात. शब्द आहे मोठा भारदस्त! पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ काय? हिस्टेरो म्हणजे गर्भाशय. सालपिंगो म्हणजे बीजांडवाहक नलिका. आणि ग्राम म्हणजे चित्र. तर, एचएसजी म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशयाकडून अंडाशयापर्यंत जाणाऱ्या दोन बीजांडवाहक नलिका (फेलोपियन ट्यूब्स) यांचा एक्स-रे फोटो. बीजांडवाहक नलिकांमध्ये काही अडसर आहे का, गर्भाशयाचा आकार या प्रतिमेमुळे समजतं. नैसर्गिक गर्भधारणा व्हायची असेल आणि IUI करणे आवश्यक झालेच तर बीजांडवाहक नलिका सशक्त आणि निर्वेध असणे महत्त्वाचे आहे.
बीजांडवाहक मालिकांमधला अडसर हे इन्फर्टिलिटीचे मुख्य कारण असते. २५ ते ३० टक्के केसेस मध्ये हे आढळते.
एचएसजी प्रक्रियेमध्ये नेमकं काय करतात?
मासिक पाळीच्या ७ व्या ते ९ दिवशी एचएसजी साठी बोलावतात. हे प्रोसिजर रेडियोलॉजिस्ट च्या क्लिनिकमध्ये होतं.
तिथे एक्स-रे रूममध्ये एका टेबलावर गयनेकोलोजी चिकित्सेवेळी सांगतात तसं, म्हणजे पाय वर दुमडून पाठीवर निजायला सांगितलं जातं. एक्स-रे साठी तुमची पोजिशन व्यवस्थित आहे की नाही याची खात्री केली जाते. नंतर योनी मार्गातून स्पेक्युलम आत सरकवितात आणि एंटीसेप्टिक सोल्युशन ने आतला भाग साफ़ करतात. मग एक कैथिटर गर्भाषयाच्या तोंडातून गर्भाषयात सरकवितात आणि स्पेक्युलम काढून घेतात. एक्स-रे काढते वेळी तुम्हाला टेबलावर पाठ सपाट ठेऊन स्तब्ध राहायला सांगितलं जातं. नंतर कॅथेटर मधून एक रंगीत डाय गर्भाशयात हळू हळू सोडला जातो. रेडियोलॉजिस्टना एक्स-रे मशीन मध्ये तो डाय पुढे सरकताना स्पष्ट दिसतो. गर्भाशय डाय भरल्यानंतर तो डाय बीजांड नलिकांमध्ये प्रवेश करतो. तिथे जर कोणताही अडसर नसेल तर तो डाय दुसऱ्या टोकाला म्हणजे अंडाशयापर्यंत पोहोचतो. या तंत्राला फ्लोरोस्कोपी म्हणतात. फ्लोरोस्कोपीमुळे गर्भाशयाचा आकार आणि बीजांड वाहक नलिका निर्दोष आहेत किंवा कसे या साऱ्या गोष्टी पाहता येतात.
एचएसजी केल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स तर होत नाहीत ना?
कॉम्प्लिकेशन्स फारच क्वचित निर्माण होतात. रंगीत डाय ची ऍलर्जी, गर्भाशयाला इजा होणं, ओटीपोटामध्ये संसर्ग होणं अशी कॉम्प्लिकेशन्स क्वचित घडू शकतात. एचएसजी झल्यानंतर ओटीपोटात पेटके येणं, रक्ताचे डाग दिसणं अशा गोष्टी होऊ शकतात.
पुढील पैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.
- योनी मार्गातून दुर्गंधीत स्त्राव येणं
- उलटी होणं
- चक्कर येणं
- पोटात कळ येणं किंवा दुखणं
- रक्तस्त्राव होणं
- थंडी वाजणं किंवा ताप येणं
एचएसजी टेस्ट होण्याआधी काय तयारी करावी?
- पहिली गोष्ट म्हणजे टेस्ट कुठे करावी हे तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट व फर्टिलिटी डॉक्टर यांच्याशी चर्चा करून ठरवा. टेस्ट साठी नावाजलेलं, अद्ययावत केंद्र निवडणं महत्त्वाचं आहे. का तर, कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत, एक्स रे फोटो व्यवस्थित निघावेत आणि परिपूर्ण रिपोर्ट मिळावा, म्हणून.
- डाय ची ऍलर्जी क्वचितच आढळते. पण तुम्हाला ऍलर्जीचा अनुभव आला असेल (पूर्वी कधी सीटी स्कॅन किंवा IVP केला तेव्हा) तर ते तुम्ही डॉक्टरांना आधीच सांगायला हवं.
- एचएसजी प्रक्रिया सुरु करायच्या आधी अँटी इन्फ्लमेटरी पेन किलर घेणं हितावह असतं. त्याच दिवशी, प्रोसीजर नंतर, जरूर वाटल्यास आणखी एक गोळी घ्यायला हरकत नाही.
- अँटी बायोटिक औषध आधी किंवा नंतर घेतलं पाहिजे का असे डॉक्टर ना आठवणीने विचारा.
- जवळ एक सॅनिटरी पॅड ठेवावं. टेस्ट नंतर रक्ताचे डाग पडू शकतात (स्पॉटिंग).
- टेस्ट करतेवेळी पती, किंवा कुणी जवळचा नातेवाईक किंवा मैत्रीण बरोबर असली तर बरं.
- टेस्टच्या दिवशी सुट्टी घ्यावी. एचएसजी मोठं प्रोसिजर नाही, पण कळा येणं आणि रक्ताचे डाग येणं असं होतं. दिवसभर मळमळ आणि बेचैनी असते. म्हणून सुट्टी घ्यावी आणि कोणी तरी सोबत असावं.
एचएसजी ला दुसरे कोणते पर्याय आहेत का?
- हिस्टेरोलॅपरोस्कोपी: ही एक शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी पेशंटला भूल देऊन बेशुद्ध करावं लागतं. गर्भाशयाचा आतील भाग व बाहेरचा भाग, बीजांड नलिका, अंडाशय तसंच ओटीपोटातले इतर अवयव या सर्वांचं व्यवस्थित निरीक्षण करता येतं.
- सोनोसालपिंगोग्राफी: या पद्धतीत कॅथेटरमधून गर्भाशयात हवा आणि सलाईन यांचं मिश्र सोडल जातं आणि सोनोग्राफी द्वारे टर्बुलेन्स पहिला जातो.