केवळ स्वप्न मनात बाळगणं वेगळं आणि त्यासाठी प्रयत्न करणं वेगळं. पण नुसतं खटपट करून भागत नाही. गर्भारपण, बाळंतपण ही अत्यंत गुंतागुंतीची जीवशास्त्रीय घटना आहे. या प्रक्रियेमध्ये कितीतरी गोष्टी घडून याव्या लागतात. गर्भधारणा होणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. मनात आलं की लगेच गर्भ प्राप्त होतो असं होत नाही. त्यासाठी ढीगभर गोष्टी ‘जुळून’ याव्या लागतात. त्यात योगायोग सुद्धा जुळून यायला लागतो. जेव्हा साऱ्या मैत्रिणी आपापली गोड बातमी देऊन जातात तेव्हा ती संधी मला केव्हा मिळेल असा प्रश्न तुम्हाला वारंवार सतावत असेल. माझ्याच बाबतीत असं का व्हावं असं वाटून गोंधळून जायला होत असेल आणि हताशसुद्धा वाटत असेल. विशेषकरून बराच काळ तुम्ही आई बनण्याच्या प्रयत्नात असाल तर! माझे सारे प्रयत्न का बरे व्यर्थ ठरत आहेत असा प्रश्न पडत असेल. गर्भवती होणं मऊमऊ पायघड्यांवरून चालण्याइतकं सोपं नाही. त्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे.
मासिक पाळी दर महिन्याला येत असली तरी गर्भधारणेची संभाव्यता साधारणपणी १५ ते २० टक्के इतकीच असते. दर महिन्यात प्रजननक्षम बीजांड प्रसवण्याचे दिवस फक्त ३-४ च असतात. त्या ३-४ दिवसात अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. प्रजननक्षम शुक्राणू प्रजननक्षम बीजांडापाशी पोहोचला पाहिजे, त्यांचा संकर होऊन तयार झालेला गर्भ बीजांड नलिकेमधून गर्भाशयापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यावेळी गर्भाशयाचे अंतर्गत त्वचावरण गर्भाचा स्वीकार करण्यासाठी तयार पाहिजे, तिथे भ्रूण (गर्भ) रुजल्यावर त्यांचे व्यवस्थित विभाजन होऊन पोषण व्हायला पाहिजे. गर्भधारणा ही एक विस्मयकारक आणि असामान्य प्रक्रिया आहे. अनेक गोष्टी यथाक्रम योग्य त्या वेळी व्यवस्थित जुळून आल्या तरच गर्भधारणा यशस्वी होते. फिल्मी दुनियेतल्या डायलॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे दैव माझ्या इच्छापूर्तीसाठी सर्व गोष्टी जुळवून आणेल व मातृत्वाची माळ माझ्या गळ्यात घालेल असं कधी होत नाही. अनेक वेळा गर्भधारणेच्या आड येणार एखादा विशिष्ट घटक उपस्थित असतो. म्हणूनच फर्टिलिटी तज्ज्ञाचा तुम्ही योग्य वेळी सल्ला घेणं आवश्यक आहे.
गर्भधारणेसाठी वेळीच सल्ला घ्यायला हवा. वेळीच म्हणजे केव्हा ते समजणे महत्वाचे.
- तुमचं वय पस्तीस च्या आत आहे पण एक वर्षाहून अधिक काळ तुम्ही गरोदर राहण्याच्या प्रयत्नात आहेत.
- तुमचं वय पस्तिशीच्या पुढे आहे आणि सहा महिन्यांहून अधिक काळ गरोदर राहण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे.
- तुमची मासिक पाळी अजिबात बंद आहे किंवा अनियमित आहे किंवा वेदनादायक आहे.
- एक किंवा त्याहूनही अधिक वेळा तुम्हाला गर्भपाताला सामोरं जावं लागलं आहे.
- तुम्हाला एक मूल आहे पण प्रयत्न करूनही पुढची खेप येत नाहीय.
- तुमची पोटाची किंवा ओटोपोटाची कुठची शस्त्रक्रिया झालेली आहे.
- तुम्हाला कुठचा ऑटोइम्यून किंवा इतर आजार किंवा कॅन्सर झाला आहे.
- तुमच्या नवऱ्याला उत्तेजना किंवा वीर्यस्खलनाची अडचण आहे.
- तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबामध्ये काही अनुवांशिक दोष किंवा घटक आहे.
- तुमचा वय ३० च्या पुढे आहे पण तुम्हाला या घटकेला मातृत्व नको आहे, त्यासाठी तुमची थांबायची इच्छा आहे पण नंतर येणाऱ्या वाढत्या वयाच्या अडचणी नको.
यांपैकी कोणताही मुद्दा तुमच्या बाबतीत लागू असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या फरटिलिटी डॉक्टरशी संपर्क साधायला हवा. या विषयाची माहिती करून घेतलीत तर ट्रीटमेंटसाठी योग्य निर्णय वेळीच घ्यायला त्यामुळे मदत होईल.