मी चांगली धडधाकट आहे, मला कोणताही आजार नाही म्हणून मूल होण्यासाठी मी काही वर्ष थांबले तर काय हरकत आहे? वय थोडं वाढलं तर त्याचा प्रजनन क्षमतेवर दुष-परिणाम होऊ शकतो ही माहितीच मुळात बऱयाच स्त्रियांनां नसते. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही धडधाकट रहाल हे खरंच आहे. पण वाढत्या वयाबरोबर प्रजनन क्षमता कमी होत जाते हेही लक्षातठेवायला हवं. ते एक महत्त्वाचं शास्त्रीयसत्य आहे. जसं वय वाढतं तसं गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. मिसकॅरेज तसंच गरोदरपणा आणि प्रसूती या दरम्यान कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता वाढत्या वयाबरोबर वाढते.
स्त्रीजवळचा बीजांडांचा साठा जन्मतःच निश्चित झालेला असतो. मुलगी आईच्या पोटात असते तेव्हा तिच्याकडे ६० ते ७० लाख बीजांडांचा साठा असतो. ती जन्म घेते तेव्हा ती संख्या १० – २० लाख इतकी असते. नंतर तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तो साठा ३ ते ४ लाख इतकाच असतो. पुढच्या काळात दर महिन्याला तिची जवळजवळ हजार बीजांड खर्ची पडतात. वाढत्या वया नुसार गर्भधारणेचं प्रमाण घटण्याचं मुख्य कारण बीजांड-साठा खालावत जाणं हे आहे. बीजांडांमधील अनुवांशिक दोषही यायची शक्यता असते. मासिक ऋतुचक्रात निर्माण होणारे स्त्रीबीज जेनेटिकली नॉर्मल किंवा ऍबनॉर्मल असू शकते. ऍबनॉर्मल स्त्रीबीजाचा सहसा संकर होऊन गर्भ तयार होत नाही. झालाच तर तो सहसा टिकत नाही. गर्भपात होऊन तो गर्भ पडून जातो. गर्भ वाढलाच तर दोष असलेलं बाळ जन्माला येऊ शकतं. या व्यतिरिक्त इतरही प्रकारची कॉम्प्लिकेशन्स उत्तर-प्रौढ वयात आढळतात. उदाहरणार्थ गर्भाशयातील फायब्रॉईड, बीजांड-नलिकेचा विकार, एन्डोमेट्रिओसिस. गर्भावस्थेतील डायबिटीस (जेस्टेशनल डायबिटीस), रक्तदाब, प्लॅसेंटा प्रिव्हिया, इमर्जन्सी सिझेरियन (सी-सेक्शन) ची रिस्क वाढते.
वर जे काही म्हटलं आहे त्याचा अर्थ असा नव्हे की वाढत्या वयात मातृत्व मिळणं अशक्य आहे. तुमच्या किंवा तुमच्या परिचित कुटुंबांमध्ये उशिरा आई झाल्याची अनेक उदाहरणं तुमच्या पाहण्यात आली असतील. आजच्या वैज्ञानिक युगात आयव्हीएफ – आयसीएसआय आणि पीजीटी सारखी आधुनिक तंत्र उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आई बनण्याचं स्वप्न जरूर प्रत्यक्षात आणू शकता. जर तुम्ही वयाची पस्तिशी ओलांडली असेल आणि सहा महिने प्रयत्न करुनही गरोदर झाला नसाल तर लगेच फोन उचला आणि तुमच्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधा, त्यांचा सल्ला घ्या.